सांडपाणी वाहून नेणारी नाली बळजबरीने बंद

0
237
Advertisements

गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरातील सांडपाणी वाहुन नेणारी नाली स्थानिक चुदरी लेआऊट मधील गोपाल लेआऊट मध्ये बळजबरीने बंद केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून सदरची नाली येत्या २२ जानेवारीच्या आत मोकळी करून द्यावी अन्यथा लेआऊटवासी स्वतः मोकळी करेल असा इशारा बब्लू रासेकर, अरविंद कोरे,दिनकर माणूसमारे सह २४ नागरिकांनी निवेदनातून दिला आहे. Gadchandur Nagar Parishad
सविस्तर असे की,चार वर्षापूर्वी शहरातील नाल्या बिबी पांदण मार्गावरील पाटाच्या पुलाला जोडण्यात आल्या.याद्वारे व्यवस्थितपणे सांडपाणी वाहून जात होते.परंतु पुला जवळील जमिनीवर एका व्यक्तीने अतिक्रमण करत अंदाजे एक वर्षापासून नाल्यात जाणाऱ्या पाण्याचा रस्ता अडवल्याने त्याठिकाणी पाणी साचले आहे.यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले असून डासांच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ झाल्याचे चित्र आहे.यापासून त्रस्त नगरिकांनी अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी दिल्या मात्र समाधानकारक उपाययोजना करण्यात आली नही.संबंधित विभाग प्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी अनेकदा सदर ठिकाणाची पाहणी करून चार दिवसात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.मात्र आजतागायत काहीच घडले नाही. News34 Chandrapur
गडचांदूर येथील प्रभाग क्रं.५ (चुदरी नगर)हे पूर्वीपासूनच समस्यांचे माहेरघर असून याठिकाणच्या समस्या सोडविण्यासाठी आमरण उपोषण, मोर्चे अशाप्रकारे मोठमोठे आंदोलन करण्यात आले.ग्राम पंचायत नंतर न.प.स्थापन झाली तरीपण कुठलेही उल्लेखनीय काम केल्याचे दिसत नाही.येथे काही ठिकाणी आजही रोड,नाली,विद्युत हे काम झाले नसून अतिक्रमणची समस्या जशीच्या तशीच बनून आहे.”मागील काळात सौ.विजयालक्ष्मी डोहे ह्या नगराध्यक्षा असताना आमच्या अडीअडचणी मोठ्याप्रमाणात दूर झाल्या. मात्र आता काहीशी वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे.” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नाली बंद केल्यामुळे परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून यासंबंधी गेल्या एक वर्षापासून सतत तक्रारींची मालिका सुरूच असून न.प.चे आरोग्य अधिकारी निव्वळ आश्वासनांची खैरात वाटत आहे तर सत्ताधारी बघ्याची भुमिका वठवत आहे. हे चित्र पाहून शेवटी येथील नागरिकांनी एकत्रितपणे लढा देण्याचे ठरवल्याची माहिती देत येत्या २२ जानेवारीच्या आत जर सदर नाली मोकळी करण्यात आली नाही तर नाईलाजास्तव हे काम आम्ही करू.कुठलाही वाद निर्माण झाल्यास न.प.प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संबंधितांनी निवेदनातून दिला आहे.
“बोले तैसे चाले” अशी ख्याती चुदरी नगरवासीयांची असून उदाहरणार्थ वर्ष २०१७ मध्ये असाच एका प्रकरणात दिलेल्या इशाऱ्याला दुर्लक्ष केल्याने अखेर स्वतःच काम सुरू केले होते. त्यावेळेस फार मोठ्याप्रमाणात वातावरण तापले होते हे मात्र विशेष. पोलीस निरीक्षकांना सुद्धा सदर बाबतचे निवेदन देऊन माहिती देण्यात आली असून यावेळी नगरसेवक अरविंद डोहे व गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आता न.प.याकडे किती गांभीर्याने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here