प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस – चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्याने सर्वत्र अवैध दारूची तस्करी जोरात सुरू झाली.
मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारू येते तरी कशी हा प्रश्न अनुत्तरित आहे, पण आज घुगूस शहरात या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे.
पहाटे 6 वाजताच्या सुमारास घुगूस शहरातील सीमेवरील पोलिसांच्या तपासणी नाक्यावर यवतमाळ जिल्ह्यातून 1 इसम दुचाकी वाहनाने देशी दारूची वाहतूक करीत असताना त्याला पोलिसांनी पकडले नाही मात्र हे दृश्य काही युवकांनी बघितल्याने तपासणी नाक्यावर चांगलाच गोंधळ घातला.
पोलिसांना हा प्रकार समजताच व तपासणी नाक्यावर जमा झालेली गर्दी बघता पोलिसांनी त्या इसमाला दारू तस्करीच्या गुन्ह्यात अटक करून देशी दारू जप्त केली.
बघता बघता त्या नाक्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली, विशेष म्हणजे तो दारू तस्कर पोलिसांच्या ओळखीचा होता, ज्यावेळी युवकांनी पोलिसांना सुनावले त्यावेळी उपस्थित पोलिसाने त्याचं नाव घेत आता त्याला सोडणार नाही असे उदगार काढले होते.
आज काही युवक व नागरिकांनी गोंधळ घातल्याने ती दारू पकडण्यात आली मात्र आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अवैध दारू अश्याप्रकारेच येत असल्याची शक्यता बळावली आहे.
सध्या घुगूस शहरात अवैध दारूचे धंदे जोरात सुरू आहे, सट्टा व्यापार, कोळसा व दारूने अनेक मारहाणीचे प्रकरण शहरात घडत आहे मात्र पोलीस या सर्व प्रकरणावर मुकदर्शक बनल्याचे सोंग करून आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे.