सभापती ठेंगणे यांच्यावरील हल्ल्याचा भाजपाकडून निषेध

0
763
Advertisements

 

भद्रावती/अब्बास अजानी

भद्रावती पंचायत समितीचे सभापती तथा बरांज येथील कोळसा खाणीचे प्रकल्पग्रस्त प्रवीण नारायण ठेंगणे यांच्यावर दि.१२ नोव्हेंबर रोजी बरांज कोळसा खाणीत झालेल्या हल्ल्याचा येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत निषेध करुन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की,बरांज खुली कोळसा खाण दि.१ एप्रिल २०१५ ला बंद झाली.

Advertisements

तेव्हापासून महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार व प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. परंतु कर्नाटक सरकार व कंत्राटदार एम्टा यांच्यातील राॅयल्टीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने आतापर्यंत सदर खाण बंद होती.परंतु राॅयल्टीचा वाद न्यायालयात निकाली निघाल्याने सदर खाण सुरु होण्याच्या हालचाली सुरु झाल्या. महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार यांच्यामधील अनेक बैठकांपैकी दि.१६ मे २०१६ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कर्नाटकचे ऊर्जामंत्री यांच्यामध्ये झालेली बैठक अतिशय महत्वाची होती. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु या बैठकीनंतर तब्बल ७ महिन्यांनी दि.१५ डिसेंबर २०१६ रोजी दोन्ही सरकारच्या अधिका-यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. त्यानंतर असे लक्षात आले की,बैठकीमध्ये झालेल्या मंजुरीला पूर्णतः बदलण्यात आले.
त्यामुळे माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी परत पाॅलिसी अॅग्रीमेंट बदलण्याची मागणी केली.परंतु अजुनपावेतो सुधारीत पाॅलिसी करण्यात आली नाही.दरम्यान,दि.७ व १० नोव्हेंबर २०२० रोजी सदर खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत जिल्हाधिका-यांसोबत बैठका झाल्या.त्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय खाण सुरु करणार नाही असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, लगेच दि.१२ नोव्हेंबर रोजी कंत्राटदारांचे काही कर्मचारी खदान परिसरात गेले व त्यांनी काम सुरु केले.ही माहिती कळताच प्रकल्पग्रस्त तेथे गेले व त्यांनी त्या कर्मचा-यांना काम का सुरु केले अशी विचारणा केली असता अजय लिहितकर, मारोती चंदनवार, गौतम सरकार आणि दिनेश दुबे यांनी तुमच्या बापाची खदान आहे का ? असे म्हणत प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी प्रवीण ठेंगणे यांना धक्का-बुक्की केली. ते ज्या वाहनात आले होते,त्या वाहनात बंदुकीसारखे शस्त्र होते.असाही आरोप जिवतोडे यांनी पत्रपरिषदेत केला.बंदुकीच्या धाकावर खदान सुरु करुन कोळसा चोरी करण्याच्या बेताने संबंधित लोक आले होते. हे लक्षात येताच संपूर्ण प्रकल्पग्रस्त एकत्रित जमले.यामध्ये पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे व अरविंद देवगडे यांच्यावर हल्ला करण्यात आला.यामध्ये दोघेही जखमी झाल्याचा दावाही जिवतोडे यांनी पत्रपरिषदेत केला.या प्रकरणाची भद्रावती पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींवर अजुनही गुन्हा दाखल केला नाही असाही आरोप करण्यात आला.यासंदर्भात ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. बरांज कोळसा खाण परिसरात दि.१२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकरणाचा भद्रावती तालुका व शहर भाजपातर्फे निषेध करण्यात येत असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास व आरोपींवर कारवाई न झाल्यास भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही पत्रपरिषदेत देण्यात आला.
पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे,माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, भाजपा कार्यकर्ते सुनील नामोजवार, केतन शिंदे, किशोर गोवारदिपे, प्रवीण सातपुते, नगरसेवक प्रशांत डाखरे, संजय पारखी, विशाल ठेंगणे,केशव लांजेकर, निशान देवगडे आणि अन्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here