भद्रावती/ अब्बास अजानी
येथील सारडा चौकातील एका व्यक्तीच्या घरासमोरुन भरदिवसा चोरीला गेलेल्या सायकलींचा छडा लावण्यात भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील सारडा चौकातील रहिवाशी आशिष आनंदीलाल सारडा यांच्या मालकीची 8 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची सायकल दि.19 आॅक्टोंबर रोजी दुपारी 1.25 ते 4.00 वाजताचे दरम्यान अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेली.सारडा यांनी सायकलीचा सर्वत्र शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही.शेवटी त्यांनी दि.22 आॅक्टोंबर रोजी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानुसार तपासाची चक्रे फिरविली असता तीन विधीसंघर्ष बालकांकडे सदर सायकल असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे त्या बालकांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे 6 हजार रुपये किंमतीची आणखी एक अॅरो रेंजर कंपनीची चोरीची सायकल आढळून आली.अशा प्रकारे चोरीच्या 2 सायकली आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किंमतीची एम.एच.34,ए.सी.6361 क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण 64 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पोलिस शिपाई हेमराज प्रधान,केशव चिटगिरे,शशांक बदामवार, निकेश ढेंगे यांनी केली.