गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहरात मोठ्या रुबाबाने विराजमान माणिकगड सिमेंट कंपनी अनेक कारणाने नागरिकांना निव्वळ डोक्याला ताप बनली असून “आम्ही कोणत्या जन्माचे पाप भोगत आहो हेच कळेनासे झाले” अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे. इतर बाबींच्या पार्श्वभूमीवर सदर सिमेंट कंपनीच्या चिमनीतून दररोज सैरावैरा निघणार्या डस्ट(धुळी)मुळे शहरवासी पुरते हैराण झाले असून घरांच्या छतांवर व घरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.अशाप्रकारे पसरत असलेल्या वायु प्रदूषणामुळे नागरिक विविध प्रकारच्या रोगांनी ग्रासले असताना प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ बघ्याची भूमिका वठवत असल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे. माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्टच्या त्रासाला कंटाळून 26 सप्टेंबर रोजी स्थानिक प्रभाग क्रमांक 2 “साई शांतीनगर” येथील रहिवासी आक्रमक झाले असून कंपनी व्यवस्थापकांना निवेदन देऊन सदर समस्या तात्काळ मार्गी लावुन होणारा त्रास दूर करावा अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, न.प.नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापतींना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.डस्ट(वायु प्रदुषण)संबंधी माणिकगड सिमेंट कंपनीवर कारवाईसाठी सभेत ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्याची मागणी न.प.कडे करण्यात आली आहे.सदर कंपनीतून नेहमीच कणीदार धुर निघत असतो यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या रोगांची लागण होत आहे.परिसरातील शेत पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याविषयी अघोषित डोळेझाक केल्याचे दिसते.कित्येक लोकप्रतिनिधी आले-गेले परंतु सदर समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यास यांनी धन्यता दाखवली नाही, ही शोकांतिका असून शेवटी शासन- प्रशासन,लोकप्रतिनिधी माणिकगड कंपनीपूढे हतबल का ? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.निवेदन देताना नगरसेवक अरविंद डोहे, अनंता रासेकर,घनश्याम पाचभाई,महादेव कळसकर,रत्नाकर लांडे,नूतन डावखरे, ईश्वर आत्राम, मिन्नाथ बोडे, गिरीधर पानघाटे,वैभव राव आदींची उपस्थिती होती.
माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट (वायु प्रदुषण)मुळे नागरिक हैराण
Advertisements