दया…..! यहां भी बहोत गडबड है

0
723
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“स्वच्छ शहर,सुंदर शहर” असे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाकडून 14 वित्त आयोग निधीच्या माध्यमातून “घनकचरा” व्यवस्थापनाच्या कामांवर लाखोंची तरतूद केली जाते.मात्र सदर काम बऱ्याच ठिकाणी अंदाज पत्रकानुसार होत नसल्याने शासनाचा मुख्य उद्देशच सफल होताना दिसत नाही.संबंधीत ठेकेदारा सोबत व्यवस्थितरित्या संगनमत करून शासनाच्या तिजोरीला चुना लावला जात असल्याची बोंब सुरू आहे.गडचांदूर नंतर आता कोरपना येथे ही घनकचरा व्यवस्थापन संबंधी नगरसेवक पुढे येत असून “स्वच्छ शहर,सुंदर शहर” केवळ कागदावरच असल्याचे आरोपांना सुरुवात झाली असून घनकचरा व्यवस्थापन संबंधी कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक अमोल आसेकर यांनी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.गडचांदूर पाठोपाठ आता कोरपना येथे ही घनकचरा प्रकरण पेटणार की काय अशी शंका वर्तवली जात आहे.
कोरपना ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध झाला.14 वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाला दरवर्षी मंजुरी दिली जाते.यामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वछता,नाली उपसा,ओला व सुखा कचरा गोळा करून व्यवस्थापन करणे,शहरातील स्वछता करणे आदी कामे अंदाजपत्रकानुसार करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली जाते.परंतु यासाठी नेमलेला संबंधित ठेकेदार व नगरपंचायत प्रशासन यांच्यात संगनमत असल्याने कामे अंदाज पत्रकानुसार होत नाही.थातूर मातूर कामे करून महिन्याला लाखोंची देयके उचल केली जात असल्याचे आरोप करत शासनाचा लाखोंचा निधी वाया जात असल्याचे नगरसेवक आसेकर यांचे म्हणणे आहे.
एकीकडे कोरोनामुळे नागरिक वैतागले असताना दुसरीकडे डेंग्यू-मलेरियाचे भूत मानगुटीवर बसत आहे.या आजाराने डोके वर काढू नये यासाठी शहरात स्वच्छता असणे गरजेचे आहे.परंतु याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसत आहे.कित्येक दिवसांपासून विविध वार्डात नाली सफाई झाली नसल्याने घाण साचलेली आहे.यामुळे भविष्यात डेंग्यू-मलेरिया सारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे आसेकर यांचे म्हणणे असून नगरपंचायत झाल्यापासून एकच ठेकेदाराकडे घनकचरा व्यवस्थापनाचे काम असल्याने मोठ्याप्रमाणात गैरवहार होत आहे.परंतु याबाबत अनेकदा लेखी तक्रार होऊन सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात जात आहे.सदर कामात लावण्यात आलेल्या कामगारांना कमी वेतन देऊन त्यांचे शोषण केले जात आहे. यासर्व प्रकारामुळे शहरातील नाली उपसा,कचरा व्यवस्थापन होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.परंतु याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे.अशाप्रकारे आरोपांच्या फैरी झाडत,कोरपना वासीयांमध्ये याविषयी तीव्र असंतोष पसरल्याचे चित्र असून हा प्रकार असाच सुरू राहिलाच तर नगरपंचायतच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक अमोल आसेकर यांनी New34 ला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here