चंद्रपूर – शासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आज चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक भोगत आहे. कोरोना विषाणूचा शिरकाव जिल्ह्यात झाला असताना सुद्धा प्रशासनाने उचित नियोजन काही केले नाही, उलट लॉकडाउन ने गोरगरीब व सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचं काम प्रशासनाने केले आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या हि ८ हजारांच्या जवळपास पोहचली असताना जनता कर्फ्यूचा शोध जनप्रतिनिधी यांनी लावला.
मागे घेण्यात आलेल्या ४ दिवसीय जनता कर्फ्यूत तब्बल १२०० च्या वर कोरोना बाधितांची जिल्ह्यात भर झाली होती, सध्या चंद्रपूरकर हा आधीच आर्थिक परिस्थितीच्या विळख्यात सापडला आहे, हातावर काम करून पोटं भरणाऱ्या जनतेचा प्रशासन कधी विचार करीत नाही.
२१ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन ला सर्वपक्षीय , व्यापारी यांची जनता कर्फ्यू संदर्भात बैठक आयोजित केली आहे, या बैठकीत गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नागरिकांचा आधीच जनता कर्फ्यूला प्रचंड विरोध आहे सोबतच काही राजकीय पक्ष सुद्धा जनता कर्फ्यूच्या समर्थनात नाही.
खरंच कोरोनाची मानवी साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी नियम पाळायला हवे, कोरोनाची साखळी जनता कर्फ्यू लावून तुटणार नाही, आज जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे पण त्यावर कोणी बोलायला तयार नाही, जनता कर्फ्यूच्या बैठकीत छोटे व्यापारी, हातावर काम करणारे याना बैठकीत आमंत्रण द्यायला हवे कारण चंद्रपूरकर जनतेच्या पोटाचा प्रश्न मोठे व्यापारी व प्रशासन भागवू शकत नाही.