चंद्रपूर: ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाहीच्या भागात कोरोनाची संख्या वाढत आहे. भविष्यात सामाजिक अंतर आणि मास्क हाच पर्याय डोळ्यासमोर असताना या भागातील मंत्रीमहोदयांनी कोरोना आणि पूर पीडित भागासाठी मदत करण्याऐवजी सौंदर्यीकरणात आणखी भर घालण्यासाठी कोटींचा निधी जाहीर केला. काळ कोणता, समाजाला सध्या गरज काय, याचे भान न ठेवता कंत्राटदाराच्या भल्यासाठी सौंदर्यीकरणाचा घाट घातला जात आहे.
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही नागरपरिषदेच्या एकूण 8 कोटी 50 लाखांच्या विकासकामांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण विकास, खार जमीन विकास व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 16 सप्टेंबर रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. एकीकडे आरोग्य विभागाला आणखी निधीची गरज आहे. तालुका स्तरावर आरोग्य सुविधा आणखी सक्षम बनिवण्याची गरज असताना श्री. वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे उद्यान सुशोभीकरणासाठी 3 कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा केले. या भागात नुकताच पूर येऊन गेला. हजारो एकर शेती वाया गेली. कोट्यावधींचे नुकसान झाले. शेतीवर आधारित उद्योग आणि रोजगार उपबल्ध करून देण्याऐवजी विकासपुरुष पुतळे रंगवायला निघाले आहेत. ब्रम्हपुरी नगरपरिषद इमारतीपुढील पुतळा सुशोभीकरणासाठी 1 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. असा एकूण 4 कोटी 50 लाख रुपये इतका निधी ब्रम्हपुरीसाठी मंजूर झाला आहे. पुतळा सुशोभिकरण ही अत्यावश्यक गरज असेल तर सर्वच ठिकाणचे पुतळे रंगवावेत. सावली येथे रमाई सभागृह बांधकाम इत्यादीसाठी 2 कोटी निधी मंजूर झाला असून सिंदेवाही येथे उद्यान सुशोभीकरणासाठी 2 कोटी निधीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
श्री. वडेट्टीवार यांनी या विषयाचा प्रभावी पाठपुरावा करून त्यात यश प्राप्त केले आहे. असाच प्रभावी पाठपुरावा गोरगरिब जनतेच्या भल्यासाठी करावा, अशी अपेक्षा सामान्य जनता करीत आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. सामाजिक अंतर राखणे आता गरज झाली आहे. अशावेळी उद्याने कुणासाठी सुशोभित करण्यात येणार आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही नागरपरिषदेतील विकासकामांना एकूण 8 कोटी 50 लाख रुपये इतका निधी मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही नगरपरिषदेच्या सौंदर्यीकरणात आणखी भर घातली जाणार आहे. असाच निधी शहराची साफसफाई करणा-या कामगरांच्या आरोग्यासाठी खर्च झाला तर त्यापेक्षा अजुन कोणते सौंदर्य हवे.
सध्या जिल्ह्यात कोरोना थैमान घालत आहे, आरोग्य विभागाचे संपूर्ण नियोजन फिस्कटल्या गेले असून पुढची परिस्थिती अजून किती भयावह असणार याची कुणाला पण कल्पना नाही, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सध्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला हवे परंतु तसे न करता आपल्या विधानसभेतील विविध सुशोभीकरणाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत आहे हे कितपत योग्य आहे? कोरोनाने जिल्ह्यातील मृतकाच्या आकड्याने शतक पार केले आहे, कोरोना सोडून बाकी आजारावर नागरिकांना रुग्णालयात साधा बेड उपलब्ध होत नाही आहे, उपचारासाठी नागरिक वणवण फिरत आहे आणि पालकमंत्री मात्र विधानसभेच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करीत आहे.
पालकमंत्री साहेब सध्या जे नागरिक उपचार घेत आहे त्यांची जाऊन साधी भेट घ्या त्यांना खरच सुशोभीकरणाची गरज आहे कि चांगल्या उपचाराची? याच उत्तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल.