भद्रावती….अब्बास अजानी
भद्रावती -भद्रावती शहरात वैविध्यपूर्ण कामांसाठी नागरिकांच्या मागणीनुसार शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून शहरातील विविध प्रभागातील चाळीस मोकळ्या जागांवर ओपन जिमचे साहित्य लावण्यात येणार आहे .याच निधीतून शहरातील ओपन स्पेस खुल्या जागांवरती संरक्षण भिंतीचेही काम करण्यात येणार आहे .त्यासाठी सर्व जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे .यापूर्वी शहरात विविध ठिकाणी ओपन जिमचे साहित्य विविध मोकळ्या जागांवर लावण्यात आलेले होते. काही ठिकाणी लावण्यात आलेले ओपन जिमचे ते साहित्य पाहून उर्वरित वार्डातील प्रभागांमध्ये हेच जिम साहित्य उभारण्यात यावे यासाठी शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने त्यांच्या मागणीची पूर्तता केली आहे. या ओपन जिमला शहरातील तरुण महिला वर्गाने उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. यामुळे नागरिकांना आपल्या भागातच व्यायामाचे साहित्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा विशेषतः युवक-युवतींचा काळ व्यायाम करण्याकडे वाढला आहे. तरूणाईच्या आरोग्यासाठी हे जीम लाभदायी ठरले आहेत. शहरातील युवकांनी फालतू कामात विनाकारण आपला वेळ न घालविता व्यायाम करून शरीरसौष्ठत्व कमवावे व आपले आरोग्य उत्तम राखावे .असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी शहरवासीयांना केले आहे.