चंद्रपूर – जळगाव येथील केसीई सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या कान्ह ललित कला केंद्रतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत चंद्रपूर शहरातील बकुळ धवने यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. गणेशोत्सव काळात विविध क्षेत्रात निपुण असलेल्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी हि ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये विविध गट विभागल्या गेले होते, चित्रकला,नाट्य , नृत्य व संगीत या गटात हि राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली . नाट्य विभागातील मोठ्या गटातून बकुळ अजय धवने यांनी एकपात्री स्पर्धेत राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. बकुळ धवने यांनी आजपर्यंत अनेक नाट्यस्पर्धेत अभिनयाचा प्रथम क्रमांक पटकविला आहे. या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यभरातील 38 स्पर्धकांमधून ती अव्वल ठरली
बकुळने महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून 4 रौप्यपदके पटकावली आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार , स्त्री शक्तीचा तेजस्विनी पुरस्कार असे विविध पुरस्कार तिला मिळाले असून तुझ्याच साठी या व्यावसायिक नाटकात तिने प्रमुख भूमिका केली आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना लवकरच बक्षीस वितरणाची तारीख कळविल्या जाणार आहे असे केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य भारंबे , मिलन भामरे , ललित पाटील कपिल शिंगाने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.