भद्रावती,अब्बास अजानी
गणेशोत्सव म्हटले की तरुणाईचा जल्लोश साजरा करण्याचा काळ असतो. उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची स्थापना करून दहा दिवस आरती, भजन, सांस्कृतिक ,बौद्धिक कार्यक्रमाची रेलचेल ठेऊन विसर्जनाच्या दिवशी डी.जे. च्या तालावर बेधुंद नाचणारी तरुणाई यंदा मात्र निरुत्साही असल्याचे चित्र दिसून आले असून भद्रावती तालुक्यात 58 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्साकडे पाठ फिरविली आहे.
मागील वर्षी भद्रावती तालुक्यातील एकूण 71 सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘बाप्पा’ ची स्थापना करून उत्साहाने वाजत-गाजत ‘बाप्पा”ला निरोप दिला होता.त्यात भद्रावती शहरात 36 आणि ग्रामीण भागात 35 मंडळांचा समावेश होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने आणि शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांवर कडक निर्बंध लादल्याने संपूर्ण तालुक्यात केवळ 13 गणेश मंडळांनी गणरायाच्या स्थापनेची तयारी दर्शवून आपल्या मंडळाची परंपरा खंडित होऊ दिली नाही.त्यात शहरातील 7 आणि ग्रामीणमधील 6 गणेश मंडळाचा समावेश आहे.या सर्व मंडळांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन केले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ शकते म्हणून काही मंडळांनी देवळात, तर काही मंडळांनी एखाद्याच्या संकुलाच्या खाजगी गाळ्यात गणेशाची प्रतिष्ठापना केली. तर काहींनी एखाद्याच्या घरीच लहानशी मूर्ती स्थापन करून आपली परंपरा कायम ठेवली. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करीत आपल्या लाडक्या ‘बाप्पा’ वरील प्रगाढ श्रध्देचे दर्शन घडविले.