भद्रावती, अब्बास अजानी
भद्रावती तालुक्यातील व माजरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या देऊरवाडा टेकडी परिसरात वणी येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना दि.३० आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेदरम्यान घडली.
शिवाजी भगत भिसे ( ४०)रा. गोकुलनगर वणी असे गळफास घेणा-या इसमाचे नाव आहे. सदर इसम लसून-जीरे, खोबरे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा आणि याच कारणाने माजरी परिसरात त्याची चांगली ओळख निर्माण झाली होती. त्याचा व्यवसायही सुरळीत सुरू होता.दरम्यान,आज अचानक त्याने टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या का केली.हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करतेवेळी सदर इसमाने भावाला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, अशी माहिती देऊन फोन कट केला.
घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविले.
पुढील तपास माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस करीत आहेत.