भ्रष्टाचारावर प्रहार करणाऱ्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचा चंद्रपुरात वसुलीसाठी तगादा

0
127
Advertisements

चंद्रपूर – विदर्भातील एका आक्रमक अपक्ष आमदारांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे मंत्रिपदाच सांभाळण्याची संधी मिळाली. शासनातील भ्रष्टाचारी-अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध त्यांनी घेतलेल्या भूमिका महाराष्ट्रात अनेकदा गाजलेल्या आहेत. विविध मागण्यांसाठी अभिनव आंदोलन करून या नेत्याने संपूर्ण महाराष्ट्राचे अनेकदा लक्ष सुध्दा वेधले आहे.तसेच शेतकरी व दिव्यांग यांच्यासाठी सरकारवर अनेक वेळा कठोर भाषेत ‘प्रहार’ सुद्धा केलेला आहे.मात्र नव्याने मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या वसुलीच्या कार्यक्रमामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रपुरातील 19 खाजगी कॉन्व्हेंट चे मंत्री महोदय स्वतः निरीक्षण करणार आहेत, या कॉन्व्हेंटमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे पत्र या मंत्र्यांच्या संघटनेत स्वतःला सेवक म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकारी व 19 खाजगी कॉन्व्हेंटच्या प्राचार्यांना दिले.त्यानंतर कार्यकर्ते वारंवार चकरा मारायला लागले.”मंत्री महोदय स्वतः येणार आहेत, आम्हाला त्यांच्यासाठी कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्ही दोन लाख रुपये आमच्या संघटनेला द्या,अन्यथा शिक्षण विभागाकडून तुमच्या चौकशा अशाच प्रकारे सुरू राहतील, चौकशी बंद करायची असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागेल”,अशी भाषा वापरून या सेवक कार्यकर्त्यांनी खाजगी कॉन्व्हेट चालकांकडे वसुलीचा तगादा लावलेला आहे. कोविड-19 आपत्तीमुळे अनेक पालकांची आवक बंद किंवा कमी झालेली आहे.त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांचे शुल्क दिले नाही. विद्यार्थ्यांकडून शुल्क मिळालेले नसल्यामुळे आर्थिक घडी बिघडल्याचे कारण पुढे करून संस्थाचालक शिक्षकांना पगार देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत किंवा काही संस्थाचालक अर्ध्या पगारावर शिक्षकांची अडवणूक करीत आहेत. अशा बिकट परिस्थितीत मंत्रीमहोदयांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाकडे या सर्व संस्थांच्या चौकशी चा तगादा लावल्याने एक वेगळाच मनस्ताप शिक्षकांच्या व प्राचार्य यांच्या मागे लागलेला आहे. मंत्रीमहोदयांच्या कानावर ही गोष्ट पोहोचलेली आहे. त्यामुळे वसुलीचा तगादा लावणार्‍या या कार्यकर्त्यांवर ते प्रहार करतात की मूग गिळून गप्प राहणे पसंत करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. नेमके पाणी कुठे मुरते आहे याचा अंदाज सुद्धा लोकांना मंत्रिमहोदयांच्या भूमिकेनं तरच लावता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here