पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील पोलीस पाटील श्री कानोजी पाटील भाकरे यांच्या घरासमोरील टीन पत्र्यांची छावणी कोसळली. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना निसर्गाने जुनगाव वासियांच्या अडचणीत आणखीनच भर टाकली आहे. या अपघातात सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नसली तरी दुचाकीसह इतर साहित्याची काही प्रमाणात नुकसान झाल्याचे घटनास्थळावरील दृश्य पाहिल्यावर लक्षात येते. अशा परिस्थितीत वैनगंगा नदीला पूर आला असल्यामुळे येथील समस्या अधिकच जटिल झाल्या आहेत. जुनगावच्या चारही बाजूंनी वाहणाऱ्या वैनगंगा नदीला पूर आला असल्याने वैनगंगेच्या उपप्रवाहावरील पूल पूर्णतः पाण्याखाली गेला असून पुलावरून अंदाजे सहा ते सात फूट पाणी वाहत आहे. ही दरवर्षीची समस्या असून पावसाळ्यात या गावांचा अनेकदा संपर्क इतर जगाशी खंडित होतो. ही बाब शासन प्रशासनापुढे रेटूनही शासन प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने या गावांना व गावातील लोकांना नावेच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास सुद्धा करावा लागतो आहे. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होऊ शकते. मात्र शासन प्रशासन नेहमीप्रमाणे दुर्घटना झाल्यावरच जागे होते व सांत्वना देण्याचे काम करते. अशा अनेक समस्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करीत असतात तरीही नागरिकांना या कठीण प्रसंगात जीवन जगावे लागत आहे.