Advertisements
चंद्रपूर : कोरोना विश्वसंकटात लॉकडाऊनमुळे अनेक आस्थापने बंद होती. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक बाबीत शिथिलता देण्यात येत आहे. मॉल्स, दुकाने, वाहतूक आदी बाबी प्रशासकीय नियमांचे पालन करून सुरू करण्यास अनुमती दिली आहे. बँकिंग, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. आदी स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सप्टेंबर महिन्यात देखील अनेक परिक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अभ्यासिका यथाशिघ्रतेने सुरू करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे इतर आस्थापणे प्रशासकीय नियमांचे पालन करत सुरू आहे त्याचप्रमाणे अभ्यासिका सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी होतकरू आहेत. सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रत्येक क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासिका बंद असल्याने अभ्यासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागात अठराविश्व दारिद्र्य, हालखीची व बेताची परिस्थिती आहे. काही आदिवासी बहुल तालुक्यात कुळाचे, मातीचे घर दिसून येतात. तर, अनेक ठिकाणी छोटेखानी घर व मोठा आप्त परिवार अशीही परिस्थिती दिसते. या अनुषंगाने जिल्ह्यातील अभ्यासिका सुरू झाल्यास हे विद्यार्थी तिथे अभ्यास करू शकतील. आपण जर प्रशासकीय नियमांचे पालन करत जिल्ह्यातील अभ्यासिका सुरू करण्याची अनुमती दिली तर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
आज जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी मला कॉल्स करून अभ्यासिका सुरू नसल्याने त्यांच्यावर निर्माण झालेली आपबिती मला सांगत आहेत. लॉकडाऊनमध्ये सुरवातीच्या काळात मी त्यांना काही काळ संयम राखण्यास सांगितले होते. आता चार महिन्यांपासून अधिक काळ लोटला असून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. कोव्हिड आजाराविषयी प्रत्येकात जागृती दिसून येते. इतकेच नव्हे तर कोरोना विषाणू संकटात नियमांचे पालन करत शिस्तबध्द जीवन जगण्याची सवय लावणे हाच पर्याय पुढील काही काळ आपल्या समोर सद्यस्थितीत दिसतो. विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणे योग्य ठरणार नाही. मी आपणास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमार्फत विनंती करू इच्छितो की, प्रशासकीय नियम व मार्गदर्शक सूचना यांचे पालन करत जिल्ह्यातील अभ्यासिका तातडीने अनलॉक कराव्यात अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.