गडचांदूर/सैय्यद मुमताज अली
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी वस्तीत 15 अॉगस्ट या स्वातंत्र्य दिनी प्रथमच राष्ट्रीय ध्वज “तिरंगा” फडकविला जाणार आहे. वस्तीतील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष “विकास कुंभारे” हे ध्वजाखालीच लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती देण्यात आली असून आजतागायत ग्रामपंचायतीच्या कारभारापासून दूर राहिलेल्या घोडणकप्पी गावात पहीली ग्रामसभा आयोजित करण्यात आली आणि सदर गावाच्या प्रश्नांसंदर्भात घेण्यात आलेला ठराव थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे.
निजामकालीन घोडणकप्पी हे गाव शंभर टक्के आदिवासी गाव असून याठिकाणी कोलाम व गोंड समुदायाचे वास्तव्य आहे. या गावातील नागरिकांनी आजपर्यंत एकदाही ग्रामसभा अनुभवलेली नाही.या गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही हे भयान वास्तव समोर पहायला मिळत असून शालेय विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाणे अवघड झाले आहे.आरोग्याचे प्रश्न, काही फुटक्या विहीरीत गढूळ पाण्यावर तर काही ग्रामस्थ थेट वाहत्या नाल्यातील पाण्यावर गुजराण कतात.येथील कोलाम समुदायांना डोंगरमाथ्यावर घरे बांधून देण्यात आली परंतु याठिकाणी पाण्याची सोय नसल्यामुळे यांना जीवघेणा संघर्ष करत दोनशे फुट डोंगरखाली वाहणाऱ्या नाल्यातून पाणी आणावा लागतो.पिण्याच्या पाण्याची समस्या दुर्भिक्ष व बिकट गरिबीमुळे वस्ती पुर्णपणे उध्वस्त झाली असून केवळ 5 कोलाम कुटुंब येथे तर 6 कुटुंब आपापल्या शेतात झोपड्या उभारून राहतात आणि उर्वरित कोलामांनी येथून पलायन केल्यामुळे यांना बांधून दिलेल्या घरांचे आता केवळ सांगाडे उभे दिसत आहे.
जिवती तालुक्यात आजही असे वस्त्या अस्तित्वात आहे ज्यांना रस्ता,पाणी,विज, आरोग्य,शिक्षण अशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाही.व्यक्तिक लाभाच्या योजनांचा याठिकाणी अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र असून आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना देय्य असलेल्या अनेक योजना संधीसाधू लोकांनी पळवून लावल्याने अनेक वस्त्या बकाल झाले आहे.अशा उपेक्षित व दुर्लक्षित वस्त्या व नागरिकांपर्यंत स्वातंत्र्याचे महत्व पोहोचावे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी या उद्देशाने कोलाम विकास फाऊंडेशन द्वारा स्वतंत्रता जागर अभियान चालविले जात आहे.यात पाथ फाऊंडेशन व स्वरप्रीती कला अकादमी यांचे सहयोग आहे.सकाळी ध्वजारोहणानंतर ध्वजाखालीच कुंभारे हे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.यानिमित्ताने घोडणकप्पीच्या निसर्गरम्य वातावरणात स्वरप्रीती कला अकादमीच्या अल्का सदावर्ते यांच्या देशभक्तीपर गीतांच्या स्वर गुंजणार असून समारोपीय समारंभाला माजी आमदार अँड.वामनराव चटप,देवनाथ गंडाते,पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड.दीपक चटप, स्वरप्रीती कला अकादमी अध्यक्ष दिलीप सदावर्ते हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.