रानभाजीच्या वितरण व्यवस्थेसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारू : खासदार धानोरकर

0
173
Advertisements

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांशी लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या तसेच रानात निसर्गता येणाऱ्या रानभाज्यांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, तसेच त्यांच्या रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश होऊन आरोग्य संवर्धन व्हावे सोबतच रानभाज्या विकणा-या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या हेतूने जिल्ह्यात रानभाजीच्या वितरण व्यवस्थेसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारू, असे प्रतिपादन खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी केले. एक दिवसीय रानभाजी महोत्सवात ते बोलत होते.

11 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर कृषी विभागाअंतर्गत एक दिवसीय रानभाज्यांचा महोत्सव शासकीय रोपवाटिका, शहर वाहतूक पोलीस कार्यालयाच्या समोर, आत्मा कार्यालयाचे सभागृहात चंद्रपूर येथे संपन्न झाला. कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्व, पाककृती इत्यादी विषयी माहिती शहरी भागातील ग्राहकांना होण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

Advertisements

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या फलोत्पादन विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ.सोनाली लोखंडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकरी हा दिवसभर शेतामध्ये राबून रानातील रानभाज्या शोधून त्या भाज्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्यांचे रानभाज्या उपलब्ध करण्यात खूप मोठे योगदान आहे. रानभाजी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. दैनंदिन भोजनात सुद्धा रानभाज्यांचा आवर्जून उपयोग करावा. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणारा रानभाजी महोत्सव खऱ्या अर्थाने रानभाजी, औषधी वनस्पती यांची ओळख निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे मत देखील यावेळी खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी मार्गदर्शनात रानभाज्या शरीरासाठी एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रानभाजी महोत्सवामुळे शहरातील नागरिकांना रानभाज्यांचे विविध प्रकार व त्यांचे उपयोग जाणून घेता आले. शरीर स्वास्थ्यासाठी पावसाळा ऋतूमध्ये येणाऱ्या रानभाज्या खाणे उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या भोजनामध्ये रानभाज्यांचा समावेश असल्याने त्यांच्यामधील रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भारताला अनेक औषधी वनस्पती तसेच रानभाज्यांचे वैभव लाभलेले आहे. त्यामुळे भारतातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला औषधी वनस्पती, रानभाजी यांची महत्त्व कळणे आवश्यक आहे. यासाठी अशा प्रकारचा रानभाजी महोत्सवामुळे नागरिकांना मार्गदर्शक ठरणारा असल्याचे विचार यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांनी व्यक्त केले. बाजारपेठेसाठी शहरातील जागा कशा पध्दतीने उपयोगात आणल्या जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

जवळपास 60 रानभाज्यांचे प्रदर्शन :

रानभाजी महोत्सवात शेतकऱ्यांनी जवळपास 60 रानभाज्यांची ओळख व विक्री व्हावी यासाठी प्रदर्शनीत उपलब्ध करण्यात आल्यात. यामध्ये प्रामुख्याने कुकुडा, धान, चुचरी, आंबाडी,  गोपिन, बांबू कोम, धोपा अर्थात अळू, मसाले पान, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, अळू,  तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोथ, करटोली, वाघेटी, चीचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, कुडा, शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा इत्यादी  रानभाज्यांची ओळख या महोत्सवात झाली.

30 पेक्षा अधिक रानभाज्यांचे स्टॉल:

जिल्ह्यातील आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट,  शेतकरी, उमेद अंतर्गत येणारे विविध महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 30 पेक्षा अधिक रानभाज्यांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. रानभाज्यांपासून बनवलेले विविध पदार्थ सुद्धा या महोत्सवात उपलब्ध होते. जिल्ह्यातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन रानभाज्या यावेळी खरेदी केल्यात.

या महोत्सवाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले. संचालन मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी केले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी तंत्र अधिकारी गणेश मादेवार, तालुका कृषि अधिकारी चंद्रपूर प्रदीप वाहने, त्यांचे अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, आत्मा आणि जिल्हा कार्यालयातील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here