चंद्रपूर – चंद्रपूर शहर मनपाने घेतलेल्या ऑनलाइन सभेमध्ये महापौर उपमहापौर सभापती व गटनेते यांना सभागृहात बसण्याची संधी देण्यात आली होती.यापैकी शहर विकास आघाडीचे गटनेते जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख सभागृहामध्ये उपस्थित होते.या सभेमध्ये देशमुख यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने खरेदी केलेल्या फेस मास्क मध्ये तसेच आपत्तीच्या काळात शहरातील गरजूंना भोजन वाटप व क्वारंटाईन सेंटरवर जेवणाचे वितरण या कामांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करून महापौर यांना ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ अंतर्गत सभागृहातील सदस्यांना या संपुर्ण कामाची माहिती देण्याची मागणी केली.तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा केली.
मास्क व सॅनेटायझरचा कृत्रिम तुटवडा व दरवाढ यामुळे केंद्रीय खाद्य,आपूर्ति व वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी 20 मार्च 2020 रोजी एक ट्वीट करून फेस मास्क व व सॅनिटायझर यांना इसेन्शियल कमोडिटी मध्ये टाकण्याची घोषणा केली. तसेच ट्रिपल लेअर मास्कची किमंत प्रत्येकी 8 रुपये पेक्षा जास्त ठेवता येणार नाही असा निर्णय घेतला. मात्र यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेने 3 एप्रिल 2020 रोजी एक लक्ष मास्कची खरेदी केली. दिल्ली येथील एका एजन्सीमार्फत ही खरेदी करण्यात आली व प्रत्येक मास्क पोटी रुपये 11.50 पैसे दर देण्यात आले. इसेन्शियल कमोडिटी अॅक्ट,ड्रग्स प्राइस कंट्रोल अॅक्ट,डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट व वेट अॅड मेझरमेंट अॅक्ट अंतर्गत हा गुन्हा आहे.
केंद्रीय मंत्री पासवान यांनी एका मास्कची कमाल किंमत 8 रूपये ठरवलेले असतांना 11 रुपये 50 पैसे दराने खरेदी कशी केली याची माहिती देऊन या गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी देशमुख यांनी केली.
चंद्रपूर मधील स्थानिक कंत्राटदार क्वारंटाईन सेंटरवर जेवण पुरवण्याचे काम करत होते. कंत्राटदराबाबत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नव्हती. परंतु अचानक या कंत्राटदारांचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यांचे जागेवर नवीन कंत्राटदार निवडण्यासाठी लिफाफा पद्धतीने निविदा उघडण्यात आली.स्थानिक पातळीवरील कंत्राटदार क्वारंटाईन सेंटरवर रुपये 115 दराने जेवण पुरवठा करत होते.मात्र नवीन कंत्राटदाराला त्याच थाळीसाठी रुपये 125/- च्या दराने हे काम कसे देण्यात आले ? जास्त दराने कंत्राट का दिले हा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला ?
मुळात महानगर पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपूर येथील त्यांचे मित्र असलेल्या हॉटेल मालक कंत्राटदाराला लाभ पोहोचण्यासाठी हा गैरप्रकार केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आपत्तीच्या काळात 5 लक्ष 68 हजार भोजन डब्ब्याचे नागरिकांना वाटप केले.71 नगरसेवकांना केवळ मिळून तीन ते साडेतीन लक्ष डब्बे देण्यात आले.इतर सर्व डब्बे सत्ताधारी पक्षाच्या नावाखाली गरज नसलेल्या लोकांना वाटप करण्यात आले. याची व्हिडीओ क्लिप दिली सर्व पुरावे दिले परंतु सत्ताधारी पक्षाचे महापौर चौकशी करायला तयार नाही ? आपल्या प्रभागातील मतदारांना डब्बे वाटप करून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय सोय केली. कोरोनाच्या काळात इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला लाज कशी वाटत नाही ? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. तसेच यापुढेही महानगरपालिकेत पदाधिकारी व प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला.
मनपाला झाली भ्रष्टाचाराच्या कोरोनाची लागण, मास्क खरेदी,डबे वाटप व क्वारंटाईन सेंटरवर जेवन पुरविण्याच्या कामात भ्रष्टाचार – पप्पू देशमुख
Advertisements