मनपातर्फे राबविण्यात येत आहे “ पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना ” १०,०००/- पर्यंतचे विना तारण खेळते भांडवली कर्ज, परतफेड करणाऱ्यांना मिळणार वाढीव कर्ज

0
47
Advertisements

चंद्रपूर – लॉकडाऊन कालावधीत शहरातील मोडकळीस आलेल्या पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी- पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. शहरात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

या योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे फिरते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. पथविक्रेते बहुदा कमी भांडवलावर पथविक्री करतात आणि जे काही भांडवल त्यांच्याकडे होते, तेही या टाळेबंदीमध्ये शिल्लक राहीले असल्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजना दि.२४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वी शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या पात्र पथविक्रेत्यांना लागू असेल. नागरी पथविक्रेते १ वर्षाची परतफेड मुदतीसह रु. १०,०००/- पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर कर्ज विना तारण असेल, विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील.

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांनी खेळते भांडवली कर्ज घेतल्यास व्याजाचे दर हे बँकेच्या प्रचलीत व्याज दराप्रमाणे तसेच भारतीय रिजर्व बँक च्या मार्गदर्शक सुचनेनुसार लागू राहतील. सदर योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेणारे पथविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये कर्जाची परतफेड केल्यास ते ७% व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यामध्ये तिमाई प्रमाणे जमा केले जाईल. सदर योजनेमध्ये डीजीटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डीजीटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या पथविक्रेत्यांना कॅशबॅकची सुविधा देण्यात येत आहे.

पीएम स्वनिधी योजनेच्या लाभाकरीता पथविक्रेत्यांनी जवळच्या सेतू केंद्र येथे ऑनलाईन अर्ज भरावा किंवा www.pmsvanidhi.mouha.gov.in या वेबसाईट वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी राष्ट्रिय नागरी उपजीविका अभियान कक्ष,महानगरपालिका चंद्रपूर (बी.पी.एल. ऑफिस इमारत, जुबली शाळेसमोर ) येथे संपर्क साधावा. महानगरपालिकेकडे आतापर्यंत ११८ पथविक्रेत्यांनी अर्ज केला असून ज्यास्तीत ज्यास्त पथविक्रेत्यांनी अर्ज करून सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाह चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

याकरीता आवश्यक कागदपत्रे-

१) आधार कार्ड ,२) आधार कार्ड लिंक असलेला मोबाइल नंबर

३) बँक पासबुक , ४ ) पासपोर्ट फोटो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here