भद्रावती, अब्बास अजानी
उदयनराजे भोसले यांनी दि.22 जुलै रोजी राज्यसभा सदस्यांची शपथ घेतांना ‘जय भवानी,जय शिवाजी ‘ या घोषणेचा उदघोष केल्या नंतर राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांनी उदयनराजे यांना दिलेल्या ताकीदिचा भद्रावती शहर शिवसेनेने निषेध केला असून एका निवेदनाद्वारे व्यंकैय्या नायडू यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी राष्ट्रपती कडे केली आहे.
येथील तहसिलदारामार्फत दि.23 जुलै रोजी राष्ट्रपतींना एक निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, राज्यसभा सभापतीनी उदयनराजे भोसले यांना दिलेली ताकीद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा,अख्या महाराष्ट्राचा व हिंदुस्थानाचा अपमान करण्याचा प्रकार आहे. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात आशीर्वाद म्हणून सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायला जमते.परंतु दिल्लीत शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला चालत नाही.यातून या पक्षाची दुतोंडी भूमिका व शिवाजी महाराजाबद्दलचे प्रेम दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे.त्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. यानंतर व्यंकैय्या नायडू यांना देशाच्या कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही.त्यांना महाराष्ट्रात कुठेही पाय ठेऊ देणार नाही.असाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतांना शहर प्रमुख नंदू पढाल ,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे ,पप्पू सारवान ,नरेश काळे ,बाळा क्षीरसागर, घनश्याम आस्वले ,हर्षल शिंदे , येशू आरगी ,मायाताई नारळे ,संगिताताई डाहूले ,अर्चना वाटेकर, शीला आगलावे ,विशाल नारळे आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.