विना मास्क फिरणे भोवले, २३० जणांकडून 46 हजारांचा दंड वसूल, 5 व्यावसायिकांवर कारवाई

0
93
Advertisements

जिवती : लॉकडाऊन शिथील केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासनाने दिल्या असूनही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे जिवती नगरपंचायतच्या मुख्याधिकारी कविता गायकवाड यांच्या नेतृत्वात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आजपर्यंत सुमारे २३० जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर पाच व्यावसायिकांवर कारवाई करीत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्याधिकारी कविता गायकवाड यांच्या नेतृत्वात नगर पंचायतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यास सुरूवात केली आहे.
याअंतर्गत, नगर पंचायतने मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या २३० जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० याप्रमाणे ४६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्व दुकाने ९ वाजता सुरु करुन ७ वाजता बंद करण्याचे निर्देश असताना अनेकजण ९ वाजतापूर्वीच सुरु करतात व सात वाजतानंतरही सुरु ठेवतात अशा ५ व्यावसायिकांवर कारवाई करुन दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई लेखापाल सागर कुऱ्हाडे, कर निरीक्षक किशोर पाटील कर्यालय अधीक्षक वरद थोरात यांच्यासह जिवती नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केली.

नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. मास्कचा वापर करावा. सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, रेड, झोन मधून आलेल्या नागरिकांनी आपली तापासणी करून घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवून सहकार्य करावे.
– कविता गायकवाड, मुख्याधिकारी,
नगर पंचायत, जिवती

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here