कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वगळता सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही, याबाबत वादविवाद सुरू आहेत.
दरम्यान, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केल्यामुळे 600 विद्यार्थ्यांच्या पालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केरळच्या वलियाथुरामध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य(आर्किटेक्चर) आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेला उपस्थित एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल बुधवारी(22 जुलै) पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी मंगळवारी (21 जुलै)सुद्धा दोन विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यामुळे केरळ पोलिसांनी थेट परीक्षेला बसलेल्या 600 विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधातच गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.