चंद्रपूर महानगरपालिकेचं रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटर सुरू, चाचणीचा अहवाल लवकर मिळणार

0
68
Advertisements

चंद्रपूर  – मागील काही दिवसात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी,कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळण्याकरीता  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे स्वत:चे पहिले कोविड १९ अँटीजन टेस्टींग सेंटर जटपुरा वॉर्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा येथे सुरु करण्यात आले आहे.
या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा  निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचार देखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाचणी केल्यानंतर निकाल यायला साधारण १२ तासाचा अवधी लागतो. रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोवीड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
येथे करण्यात येणाऱ्या चाचण्या या इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रीसर्चच्या दिशा निर्देशानुसारच करण्यात येतात.  कोविड सदृश्य लक्षणे ताप, सर्दी, थकवा, खोकला असलेल्या व्यक्ती, कंटेनमेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातील रुग्ण, रुग्णालयाच्या संशयीत कक्षातील रुग्ण यांची विशेषतः तपासणी केली जाते. या केंद्राच्या माध्यमातुन महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक चाचण्या करता येणार असून चाचणीचा निकाल प्राप्त होण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.
आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात रॅपिड अँटीजन टेस्टींग सेंटर येथील नोडल अधिकारी म्हणुन डॉ. वनिता गर्गेलवार यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे व त्यांना सहाय्यक म्हणुन मेडीकल ऑफिसर डॉ. जयश्री वाडे तसेच विद्या चौधरी, स्नेहल शंभरकर, अनिता बंडेलवार, स्मिता उराडे, बालाजी जाधव, शुभम दिवसे, राकेश सोयाम व प्रलय पडगलेवार अशी मनपा टीम येथे कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here