वन अकादमी कोविड केअर सेंटर येथील शंभरावा कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्ण पूर्णपणे बरा

0
279
Advertisements

चंद्रपूर –  कोविड केअर सेंटर, वन अकादमी येथून १०० वा कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्ण पूर्णपणे बरा होऊन गुरुवार १६ जुलै रोजी डिस्चार्ज झाला आहे. आतापर्यंत या सेंटरमधे १८५ रुग्ण भरती झाले असून सद्यस्थितीमध्ये ७४ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.  वन अकादमी स्थित या केअर सेंटरमधे लक्षणे नसलेली – सौम्य लक्षणे असलेली परंतु कोव्हीड पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींना दाखल केले जाते.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे या कोविड केअर सेंटरची संपूर्ण व्यवस्था सांभाळण्यात येत असून नोडल;अधिकारी म्हणून डॉ.आविष्कार खंडारे कार्यरत आहेत. औषधे, सकस आहार, बाटलीबंद पाणी यासोबतच दैनंदिनीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा मनपातर्फे पुरविण्यात येतात. येथे ८० प्रशस्त खोल्या असून प्रत्येक रुग्णाला वेगळे बाथरूम असणारी खोली दिली जाते. दर ८ तासाला प्रत्येक रुग्णाची तपासणी डॉक्टर, नर्सद्वारे केल्या जाते. कुठलीही वैद्यकीय आपातकालीन परिस्थितीशी सामना करण्यास ऑक्सिजन तसेच इतर वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेली रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असते. येथील अधिकारी व कर्मचारी यांना पीपीई किट सुद्धा मनपाद्वारे पुरविण्यात येते.
शारीरिक तपासणी बरोबरच रुग्णांना मानसिक कोरोना स्थितीतुन बाहेर पडण्यास वेळोवेळी तज्ज्ञांकडून रुग्णांची मानसिक तपासणी करण्यात येते. सर्व रूग्णांना त्यांच्या आजाराचा सामना करण्यास व सुदृढ मानसीक व शारीरिक आरोग्य राखण्यास प्रवृत्त केले जाते. येथेच स्वॅब कलेक्शन सेंटर सुद्धा स्थापित करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ५२४ संशयित रुग्णांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असून ज्यात १२ पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजुरवार यांच्याद्वारे वैद्यकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात असून  मनपा उपायुक्त गजानन बोकडे यांच्याकडे साहित्य व्यवस्था, सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक यांच्याद्वारे स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे. डॉ. नयना उत्तरवार यांच्याद्वारे स्वॅब यादी तयार करून पाठविणे तर साहित्य पुरवठा डॉ. अश्विनी भारत यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात केला जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल कर्डीले व महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात कोविड केअर सेंटरचे काम नियोजनबद्धरीत्या केले जात आहे.  रुग्णांची नियमित देखरेख व उपचार करणारे सर्व डॉक्टर व नर्सिंग स्टाफ तसेच अथक काम करणारे मनपा सफाई कर्मचारी या संपुर्ण टीमद्वारे सदर कोविड केअर सेंटर यशस्वीरीत्या चालविले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here