सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. टेड्रॉस म्हणाले, “कोरोना विषाणूची जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरातले नेते ज्या पद्धतीची पावलं उचलत आहेत त्यातून संमिश्र संदेश जात असल्याने लोकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे.”
“सध्या हा विषाणू जगभरातल्या लोकांचा क्रमांक एकचा शत्रू आहे. मात्र, अनेक सरकारं आणि लोकांची कृती बघून तर तसं वाटत नाही.”
सोशल डिस्टंसिंग पाळणं, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणं आणि गरजेच्या ठिकाणी मास्कचाा वापर करणं, अशा उपायांना गांभीर्याने घेतलं पाहिजे. नाहीतर नजिकच्या भविष्यात परिस्थिती पूर्वीप्रमाणे सामान्य होईल, असं वाटत नसल्याचा इशाराही डॉ. टेड्रॉस यांनी दिला.
“बेसिक गोष्टींचं पालन केलं नाही तर एकच मार्ग आहे. कोरोना थांबणार नाही. जागतिक आरोग्य संकट दिवसेंदिवस चिघळत जाईल.”
लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथील करण्यात आल्याने आणि काही भाग खुला करण्यात आल्याने ‘संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर’ झाला आहे.
मोठी शहरं बंद केल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. मात्र, कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी काही विशिष्ट भागांमध्ये लॉकडाऊन करणं गरजेचं आहे,
जगभरातल्या सरकारांनी स्पष्ट आणि कठोर धोरणांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. याविषयी सांगताना डॉ. रायन म्हणाले, “जनतेला परिस्थितीचं गांभीर्य कळायला हवं आणि उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं, त्यांनाही सुलभ व्हायला हवं.”
डॉ. रायन म्हणाले, “आपण या विषाणूसोबत रहायला शिकायला हवं.”
पुढे त्यांनी असंही सांगितलं की कोरोना संसर्गातून बरं झालेल्यांच्या शरीरात या विषाणूविरोधातली रोगप्रतिकारक क्षमता तयार होते का आणि होत असल्यासं ती किती काळ टिकते, हे अजून स्पष्ट नाही.
यासंदर्भात सोमवारीच किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या शास्त्रज्ञांनी एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. कोरोना विषाणूविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती शरीरात जास्त दिवस टिकत नसल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे.