गंजवार्डातील भाजी विक्रेत्यांना दिलासा, जागेचे भाडे 75 रुपयांऐवजी 30 रुपये प्रतिदिन, स्थायी समिती सभेत निर्णय

0
52
Advertisements

चंद्रपूर  – पावसाळ्याचे दिवस बघता गंजवॉर्डातील बाजाराची नव्याने रचना करून व्यवसायाकरीता जागावाटपाची प्रक्रिया मनपातर्फे सुरु करण्यात आली आहे. याकरीता जागावाटपाच्या धोरणात बदल करण्याचा ठराव मा. सभापती श्री. राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समिती बैठकीत पारित करण्यात आला असून त्यानुसार यापूर्वी ७५ रुपये प्रतिदिन असलेले जागेचे वार्षिक शुल्क आता ३० रुपये प्रतिदिन इतके कमी करण्यात आले आहे.
मा. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार भाजी विक्रेत्यांची अडचणीची परिस्थिती बघता त्यांना दिलासा म्हणुन ७५ रुपये प्रतिदिन असलेल्या शुल्कात कपात करून ३० रुपये या माफक दराने शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेत यापूर्वी झालेल्या पहिल्या ठरावानुसार   आकारण्यात येणारे शुल्क कमीच ठेवले होते, तसेच हे दरही विक्रेत्यांना अधिक वाटल्यास यात बदल करण्याच्या सूचनाही मा. सभापती श्री. राहुल पावडे यांनी केलेल्या होत्या. व्यावसायिकांनी सदर शुल्क कमी आकारण्याचे निवेदन मा. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना केल्यानंतर, त्यांनी यासंबंधी सूचना मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार व सभापती श्री. राहुल पावडे यांना केल्या होत्या, त्यानुसार आता प्रतिदिन शुल्काची रक्कम कमी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंजवॉर्डातील भाजीबाजारात सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जात नसल्याने सदर बाजार कोनेरी तलावात सुरु करण्यात आला होता. मात्र पावसाळा सुरु झाल्याने भाजीमार्केटचे पुर्नस्थलांतरण करणे आवश्यक असल्याने, महानगरपालिकेतर्फे गंजवार्डातील जागेची नव्याने रचना करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करता येईल अशी आखणी करण्यात आली. कायदेशीररीत्या जागावाटप होईल अशी प्रक्रिया भाजीविक्रेत्यांशी चर्चा करून राबविण्यात येत असून भोगवटाधारक म्हणून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करून दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here