खाजगीकरणाच्या विरोधात आयुध निर्माणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

0
281
Advertisements

अब्बास अजनी
भद्रावती
भद्रावती : केंद्र शासनाने अवलंबिलेल्या आयुध निर्माणीच्या खाजगीकरणाच्या विरोधात देशातील ८२ हजार आयुध निर्माणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे येथील चांदा आयुध निर्माणीच्या संयुक्त संघर्ष समीतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

देशातील सर्व ४१ आयुध निर्माणीतील कर्मचारी अनिश्चित काळासाठी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला चांदा आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांचे समर्थन राहणार आहे. संयुक्त संघर्ष समितीत सहभागी असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी मजदूर युनियन, एम्प्लॉईज युनियन, भारतीय सुरक्षा कर्मचारी संघ, स्वतंत्र मजदूर युनियन आणि सर्व युनियन व असोसिएशन आयुध निर्माणी चांदाच्या सर्व महासचिवांनी सांगितले की, सरकारतर्फे ४१ आयुध निर्माणींचे खाजगीकरण करण्याबाबत घेतलेला निर्णय हा मनमानी, असंवैधानिक आणि अन्यायकारक आहे.

Advertisements

या निर्णयामुळे आयुध निर्माणीत काम करणारे ८२ हजार कर्मचारी आक्रोशित झाले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. केंद्र शासनाचा हा निर्णय माजी संरक्षण मंत्री स्व. जॉर्ज फर्नांडिस, प्रणव मुखर्जी, ए. के. अँटोनी आणि स्व. मनोहर पर्रीकर यांनी महासंघांसोबत केलेला समझोता आणि दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन आहे. महासंघांतर्फे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर शासनातर्फे सकारात्मक विचार करण्यात आलेला नाही. असा आरोप संयुक्त संघर्ष समितीने केला आहे. त्यामुळे तीनही महासंघांनी देशातील सर्व ४१ आयुध निर्माणींमध्ये अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिश्चित कालीन संपावर जाण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता देशातील सर्व ४१ आयुध निर्माणींमध्ये दिनांक ८ जून ते १७ जून पर्यंत संपा करिता मतदान घेण्यात आले. त्यात कोरोना टाळेबंदी असतांनासुद्धा ९९ टक्के कर्मचाऱ्यांनी मतदानात भाग घेतला. तसेच अनिश्चित कालीन संपावर जाण्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान केले.

याचाच अर्थ केंद्रशासनाच्या आयुध निर्माणींचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात जनादेश मिळाला आहे. त्यामुळे महासंघांतर्फे याबाबतीत आपसात चर्चा करून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात टाळेबंदी असल्याने अनिश्चित कालीन संपावर जाण्याचा निर्णय जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. संपाच्या काळात प्रत्येक आयुध निर्माणी स्तरावर प्रदर्शन आमसभा घेण्यात येणार आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here