सिंदेवाही तालुक्यात येणार्‍या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवली जावी : ना. विजय वडेट्टीवार

0
283
Advertisements

पोर्टलला विरोध करणाऱ्यांचा बहिष्कार

सिंदेवाही – : सिंदेवाही तालुक्यात येणार्‍या प्रत्येक नागरिकाची नोंद घेण्यात यावी. तसेच बाहेरून येणाऱ्यांना गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जावे. त्यासाठी आवश्यक सुविधा तसेच गरजेनुसार वैद्यकीय मदत योग्य पद्धतीने केली जावी. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये आज दुपारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना आजारास संदर्भात तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, सिंदेवाही नगराध्यक्ष आशाताई गंडाते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे,तहसीलदार गणेश जगदाळे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
सिंदेवाही तालुक्यामध्ये सध्या दोनच बाधित रुग्ण आहेत. ते सुद्धा कोरोना लक्षणातून बरे झाले आहेत. सध्या तालुक्यामध्ये एकूण २९ नागरिक गृह व संस्थात्मक अलगीकरणात आहेत. या सर्वांची योग्य काळजी घेण्याबाबत यावेळी पालकमंत्र्यांनी सूचित केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे,नगराध्यक्ष आशाताई गंडाते यांनी यावेळी काही सूचना केल्या.
वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावेळी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना जनजागृती विषयी माहिती दिली. तसेच आशा वर्कर व स्थानिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र द्वारे सुरू असलेल्या उपाययोजनांची ही त्यांनी यावेळी माहिती सांगितली. पालकमंत्र्यांनी यावेळी तालुक्यात होत असलेल्या अन्नधान्य पुरवठा, डॉक्टरांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा व पावसाळ्याच्या पूर्वी साथ रोख संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा देखील आढावा घेतला.
सलून मालकांना किटवाटप
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता संचारबंदी शिथिल केली असली तरी, अनेक व्यवसायावर मात्र या काळात निर्बंध टाकण्यात आले आहे. सलून चालकांना देखील सध्या दुकाने उघडण्यास परवानगी नाही. सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा हा निर्णय असला तरी या व्यावसायिकांवर अन्याय होऊ नये व लवकरच परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी सिंदेवाही शहरातील काही सलून मालकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप यावेळी केले.अशा परिस्थितीत शासन सर्व घटकांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री उद्या ब्रह्मपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर असून उद्या ब्रह्मपुरी येथे कोरोना आजारात संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here