2 वर्षात 2 कोटींची वाढ शक्य आहे का? यंग चांदा ब्रिगेडने केली चौकशीची मागणी

0
47
Advertisements

चंद्रपूर – शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बागेच्या सौदर्यीकरणासाठी काढण्यात आलेल्या कंत्राटात दोन वर्षात २ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी काढलेल्या कंत्राटात कमी रक्कमेत पाच वर्षाचे मेन्टनंस कंत्राटदाराकडे होते तर नव्या कंत्राटात रक्कम वाढूनही केवळ २ वर्षाचे मेन्टनंस कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. मागील कंत्राटदारालाच हे काम वाढीव रक्कमेत देण्यात आल्याने या कंत्राटात गैरव्यवहार झाला असल्याची शंका उपस्थित होत आहे. त्यामूळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन मनपा आयूक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे.

शहरात मध्यभागी असलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीचाच्या विद्युतीकरणासह बागेला विकसीत करण्याच्या कामासाठी २०१६ मध्ये मनपाद्वारे ठराव पारीत करुन  निवीदा मागविण्यात आल्या. त्यावेळेस दोन नागपूरच्या तर चंद्रपूरच्या एका अशा तिघांनी निविदा सादर केली होती. यावेळी विजय घटे या कंत्राटदाराची निविदा इतर कंत्राटदाराच्या तूलनेत ९.१० टक्के कमी दरात असल्याने विजय घटे या कंत्राटदाराला चार कोटी ४६ लाख २५ हजार ९०१ रूपयांचे हे कंत्राट देण्यात आले. यात पाच वर्षे देखभाल दुरूस्तीच्या नावावर ९६ लाखांची रक्कम जोडण्यात आली होती. मात्र, या कामाचे कंत्राट देताना अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर हे प्रकरण तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पोहचल्या नंतर सदर कामाची चौकशी  आदेश देण्यात आले होते. त्यानूसार विभागीय आयुक्तांनी चौकशी केली. व महानगरपालिका आयुक्तांना याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले गेले. त्यानंतर या बगिचाच्या पुनर्विकास, सौदर्यीकरणाच्या कामाची नविन निवीदा काढण्यात आली. यावेळी मे. विजय घटे इंजिनिअर अॅण्ड कॉन्ट्रक्टर चंद्रपुर या जुन्याच कंत्राटदाराने पून्हा आपली निविदा सादर केली ही निवीदा १५ टक्के जास्त दरात होती. एकंदरीत सदर  कंत्राटदाराला सहा कोटी ५३ लाख ६४ हजार ६७० रूपयांत हा नवा कंत्राट देण्यात आले. आधीच्या कंत्राटात देखभाल दुरूस्तीसाठी पाच वर्षे ठरवुन दिली होती. मात्र, आता कंत्राटदारावर मेहेरबानी दाखवीत हा कालावधी केवळ दोन वर्षाचा करण्यात आला आहे. त्यामूळे या सर्व कंत्राट पध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. दोन वर्षात दोन कोंटीची वाढ होतेच कशी अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. याची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, वैशाली रामटेके, आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here