जिल्ह्यातील आधार कार्ड केंद्र सुरू, अटी- शर्तीवर करता येणार काम

0
191
Advertisements

चंद्रपुर – सद्यस्थितीत राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. यातच नागरिकांना महत्त्वाचे व्यवहार करण्याकरीता आधार कार्डची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आधार केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

सर्व आधार नोंदणी केंद्र चालकांनी आपल्या केंद्राचा परिसर दररोज स्वच्छ करुन केंद्रातील सर्व उपकरणांचे निर्जंतुकीकरण करावे. आधार नोंदणी केंद्रावरील व्यवस्थापक व कर्मचारी यांनी कोरोनाच्या स्वच्छता पध्दतीचे पालन करावे. कार्यरत कर्मचारी,येणाऱ्या नागरीकांकरीता साबणाने किंवा हॅण्ड सॅनिटायजरने हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.

Advertisements

 सर्व कर्मचाऱ्यांनी काम करतेवेळी नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे व वैयक्तिक स्वच्छता पाळावी. कर्मचारी, नागरीकांनी काम करतांना नेहमी मास्क लावावे. आधार नोंदणी करतांना नागरीकांनी मास्क काढून फोटो काढावे.

आधार नोंदणी केंद्राना भेट देणाऱ्या नागरीकांनी बायोमॅट्रीक उपकरणांना व इतर साधानांना स्पर्श करण्यापूर्वी हात साबणांनी धुवावे व तशी व्यवस्था केंद्र चालकांनी त्याठिकाणी उपलब्ध करावी . प्रत्येक नोंदणी झाल्यानंतर आधार नोंदणी चालकांनी बायोमॅट्रीक उपकरणे सॅनेटराईज करणे आवश्यक राहील. आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांपैकी जर कुणी सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनाच्या त्रासाने त्रस्त असेल तर त्यांना बरे होईपर्यंत केंद्रात काम करु देवु नये.

जर एखादा नागरीक सर्दी, ताप, खोकला किंवा श्वसनाच्या त्रासाने ग्रस्त असेल व आधार नोंदणी करीता किंवा इतर कामाकरीता आला असेल तर त्यांना पुर्णपणे बरे झाल्यानंतर येण्यास विनंती करावी. आधार नोंदणी चालकांनी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक नागरीकांची नोंद (संपुर्ण नाव, संपूर्ण पत्ता व मो.क्र) नोंदवहीत घेण्यात यावी.

आधार नोंदणी चालकांनी केंद्रात व केंद्राबाहेर गर्दी होणार नाही. याबाबत दक्षता घ्यावी.  नागरीकांमध्ये कमीत कमी एक मिटर अंतर असणे व त्यानुसार केंद्रचालकांनी आखणी करून ठेवणे बंधनकारक राहील.आधार नोंदणी केंद्र चालकांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर राहिल अशी त्यांची बैठक व्यवस्था करावी.

केंद्रचालक व नागरीकांनी वरील प्रमाणे आदेशाचे पालन न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकने, केंद्राजवळ विनाकारण फिरणे इत्यादी गैरकृत्य करतांना आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

सर्व केंद्र चालकांनी वरील प्रमाणे देण्यात आलेल्या सूचना अधिकृत केलेल्या आधार नोंदणी केंद्राच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.आधार नोंदणी केंद्र सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5  या वेळेत सुरु राहतील.शनिवार, रविवार व शासकीय सुट्टयांचे दिवशी आधार नोंदणी केंद्र पुर्णतः बंद राहतील.

आधार नोंदणी केंद्र चालकांना जिल्हा प्रशासनाकडून अटी-शर्तीवर  आधार नोंदणी उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्या अटी-शर्तींचा भंग झाल्यास जसे, नागरिकांमध्ये सामाजिक अंतर न राखणे, आधार नोंदणी केंद्र यांचे ठराविक कालावधीनंतर निर्जंतुकीकरण न करणे, नागरिक व कार्यरत कामगार यांचे कडून मास्कचा वापर न होणे, नागरिक व कार्यरत कर्मचारी यांचेकरीता हात धुण्याकरीता साबन किंवा हॅण्ड सॅनिटायनर्स न ठेवणे. या बाबी निदर्शनास आल्यास किंवा सामान्य नागरिकांकडून याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास सदर आधार नोंदणी केंद्र प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसुचना न देता तात्काळ बंद करण्यात येईल. याची आधार नोंदणी केंद्र चालकांनी नोंद घ्यावी.

वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीने साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केलेला आहे. असे मानण्यात येईल याची नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here