चंद्रपूर – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. शाळा-महाविद्यालय बंद असून जिल्ह्याच्या ठिकाणी चंद्रपुरला बाहेरगावून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचे भाडे खासगी वसतीगृहाने घेऊ नये अशी मागणी पाथ फाउंडेशनने जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर शहरात स्पर्धा परीक्षा तयारी करण्याकरिता बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. तसेच, महाविद्यालयीन शिक्षणासाठी बरेच युवक शहरातील खासगी वसतीगृहात राहतात. सध्या संचारबंदीने अनेक आर्थिक संकट निर्माण झाली आहेत. ग्रामीण भागात शेती हा महत्वाचा व्यवसाय असून शेतमाल विक्री करणारी यंत्रणा कोलमडल्याने शेतकरी देखील चिंताग्रस्त झाला आहे. या भीषण परिस्थितीत कोणतेही भाडे खाजगी वसतीगृहाने आकारू नये यासाठी जिल्हाधिका-यांनी सूचना प्रसिद्ध करावी अशी मागणी विद्यार्थ्यांत जोर धरू लागली आहे. खाजगी वसतीगृहाचे मालकांनी विद्यार्थी व पालकांकडे भाड्यासाठी तगादा लावला असून भाडे न भरल्यास वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे सामान न देणे आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवण्यात येत आहे.
राज्यातील सर्व घर मालकांना तीन महिने घर भाडे घेऊ नये अशी सूचना गृहनिर्माण विभागाने प्रसिद्ध केली होती. काही जिल्ह्यात जिल्हाधिका-यांनी घर भाडे आकारल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यातून अनेकांना दिलासा मिळाला. कायद्यापुढे सर्व समान आहेत. ज्याप्रमाणे घरभाडेसंबंधी सूचना दिली त्याचप्रमाणे खाजगी वसतीगृहाबाबत सूचना देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पाथ फाउंडेशनचे संस्थापक दीपक चटप यांनी केले.
शहरात खाजगी वसतीगृहात राहणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असून सध्याची परिस्थिती बघता तातडीने जिल्हाधिका-यांनी हा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे असे मत चंद्रपूर येथे शिकत असलेला विद्यार्थी आदित्य आवारी यांनी मांडले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी माणूसकीच्या दृष्टीने हा निर्णय गरजेचा असल्याने ही मागणी पाथ फाउंडेशनचे दीपक चटप, आदित्य आवारी, लक्ष्मण कुळमेथे, धम्मदिप वाघमारे, सुनील जेऊरकर, चेतन खोके, रामचंद्र काकडे, खुशाल अडवे आदींनी केली आहे.